महाराष्ट्र प्राणी रक्षक कायद्याने काटेकोर पालन व्हावे यासाठी नेवासा पोलीस स्टेशन व पशू संवर्धन विभाग यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत नेव...
महाराष्ट्र प्राणी रक्षक कायद्याने काटेकोर पालन व्हावे यासाठी नेवासा पोलीस स्टेशन व पशू संवर्धन विभाग यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत नेवासा शहरात मोक्याच्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. त्यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करतांना डॉ.पंडुरे बोलत होते.
महाराष्ट्र शासनाने ४ मार्च 1915 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1991 लागू केला आहे. या कायद्याअंतर्गत गोवंशीय प्राण्याचे व उत्पादक म्हशी तसेच रेडे, वाळू यांच्या कत्तलीस निर्बंध घातले आहेत. तसेच या प्राण्यांच्या कत्तल करण्यासाठी वाहतूक करण्यास कायदेशीर बंदी आहे. यासाठी दहा हजार रुपये दंड व पाच वर्षाच्या कालावधीच्या शिक्षेची तरतूदही कायद्यात आहे. तसेच 1960 च्या प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठीही काटेकोर अंमलबजावणी होत आहे. या कायदा अंमलबजावणीत जनतेचा सहभाग वाढवण्याचे शासनाचे धोरण आहे.
या धोरणाचा भाग म्हणून नेवासा शहर पोलीस व महाराष्ट्र शासन पशू संवर्धन विभाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा बसस्थानक, लक्ष्मी चौक, नगरपंचायत चौक, मोहिनीराज मंदिर, नाईकवाडी पुरा या भागामध्ये नागरीकांना कायद्याची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली व भित्तीपत्रके लावून चौकात बैठकही घेण्यात आली.
यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश पंडुरे, डॉ.अमोल जाधव, जि.प.सोसायटीचे संचालक विलास वाघ यांनी मार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी आ्ण्णासाहेब डाके, पोलीस नाईक नारायण ढाकणे, अमोल आसवे, दादासाहेब गरड, नानासाहेब तुपे आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्य़क्रमात भाग घेऊन नागरिकांना सहकार्य़ाचे आवाहन केले.










