लातूर - लातूर मधील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शालेय परीक्षा मार्च अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन केले असू...
लातूर - लातूर मधील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शालेय परीक्षा मार्च अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन केले असून खासगी क्लासांनाही दोन महिने शिकवणी बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे जवळपास दीड लाख लोकसंख्या कमी होऊन पाण्याची मागणी कमी होईल, असा तर्क सरकारी यंत्रणेने लावला आहे.
सध्या लातूर शहराचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट आहे. मांजरा धरण आणि साई-नागझरी बंधाऱ्यातील जलसाठा पूर्णपणे आटल्याने सध्या अख्खे शहर टँकरवर अवलंबून आहे. बहुतांश बोअर कोरडे पडल्यामुळे शहरा बाहेरून भरून येणाऱ्या खासगी टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. हे दरही वाढले आहेत. ६००० लिटरचा टँकर किमान ७०० ते ९०० रुपये तर शुद्ध पाणी असल्याचा दावा करून २० लिटरच्या जारचा दर ३० रुपयांवरून ५० रुपयांवर गेला आहे. परिणामी महागडे पाणी विकत घेऊन अख्खा उन्हाळा काढता येणे शक्य नसल्याचा अंदाज बांधून अनेकांनी शहरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिली ते दहावीपर्यंत शिकणारे शहरात जवळपास एक लाख विद्यार्थी राहतात. परीक्षा संपल्यानंतर ६० टक्के विद्यार्थी तात्पुरते स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे तसेच जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी गेल्या आठवड्यात शहरातील खासगी क्लास चालकांची बैठक घेऊन एप्रिल आणि मे महिन्यात शिकवणी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना घरबसल्या नोट्स देऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. दहावी आणि बारावीसाठी २५ हजारांवर विद्यार्थ्यांनी खासगी शिकवण्या लावल्या आहेत. शहरात राहणारी ही मुले गावाकडे गेल्यास पाण्याची मागणी कमी होणार आहे.










