अहमदनगर - गेल्या काही महिन्यांपासून स्त्रीयांना मंदिर प्रवेश हा वाद सुरु असतांना त्यातच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या...
अहमदनगर - गेल्या काही महिन्यांपासून स्त्रीयांना मंदिर प्रवेश हा वाद सुरु असतांना त्यातच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या शनिवार 19 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महिलांना शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश द्यावा यासाठी चार महिलांसह कोणतीही पूर्व सूचना न देता शनिशिंगणापूरमध्ये येऊन चौथऱ्या समोरील पादुकांचे दर्शन घेवून घोषणाबाजी केली. त्यांच्या अचानक आगमनामुळे आणि घोषणाबाजीमुळे देवस्थानात प्रचंड गदारोळ माजला.
महिलांना शनि चौथऱ्यावर प्रवेश द्यावा यासाठी देसाई या अनेक महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. फेब्रुवारीमध्येच त्यांनी शिंगणापूरातल्या विश्वस्तांशी चर्चा करण्यासाठी शिंगणापूरकडे जात असतांना नगर पोलिसांनी त्यांना रोखले. नोटिसाही दिल्या. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी पूर्व सूचना न देताच शिंगणापूरात येण्याचे जाहिर केले होते.
देसाई यांनी शनिशिंगणापूरात चौथऱ्या खाली असलेल्या पादुकांचे दर्शन घेतले. याचवेळी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांनी देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देसाई यांच्यासोबत शिरुर तालुक्यातील कांतीलाल गवारे, पुण्याच्या शायनाज शेख होत्या.










