नगर - आम्ही राम मंदिर बांधायला निघालो आहोत, आम्हाला अडवू नका, तिकीटही मागू नका; अन्यथा रेल्वेस्टेशन बॉम्बने उडवून देऊ, असे धमकीचे प...
नगर - आम्ही राम मंदिर बांधायला निघालो आहोत, आम्हाला अडवू नका, तिकीटही मागू नका; अन्यथा रेल्वेस्टेशन बॉम्बने उडवून देऊ, असे धमकीचे पत्र नगर रेल्वेस्टेशन व्यवस्थापकांना मंगळवारी दुपारी टपालाद्वारे मिळाले. या प्रकाराची माहिती मिळताच संपूर्ण रेल्वेस्टेशन परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रेल्वे पोलिस एटीएस पथकाने श्वानपथकासह रेल्वेस्टेशन परिसराची पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक अरुण पाटील यांना हे पत्र मिळाले. साध्या वहीच्या पानावर ते लिहिलेले होते. खासदार दिलीप गांधी, शिवसेना आमदार यांच्याकडून कळवण्यात येते की, सर्व स्टेशन स्टाफ सावधान राहणे, कारण आमची माणसे अयोध्येला राम मंदिर बांधण्यास जात आहेत. आम्हाला कोणी अडवून तिकीट मागितले, तर त्याचा परिणाम वाईट होईल, तो परिणाम म्हणजे बॉम्बस्फोट, रविवारी हे काम होईल,' असे पत्रात म्हटले आहे.
पत्राच्या शेवटी रोहिदास भालेराव, पंचशीलनगर असे नाव पत्ता दिलेला आहे. स्टेशन व्यवस्थापक पाटील यांनी रेल्वे पोलिसांसह पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांसह एटीएस पथकाने संपूर्ण रेल्वेस्टेशन परिसराची श्वान पथकाद्वारे तपासणी केली. स्टेशन परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकारामुळे स्टेशन परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. रेल्वे पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपास रेल्वेचे सहायक फौजदार एस. डी. दिवटे हे करत आहेत. पत्राशी कोणताच संबंध नाही. पत्राच्याशेवटी नाव असलेल्या राेहिदास भालेराव यांचा भाऊ रामदास भालेराव याने रेल्वे पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्या भावाच्या नावाने अज्ञात शत्रूने हे पत्र लिहिले आहे. माझा रोहिदास याचा शिवसेना- भाजपशी काहीही संबंध नाही. मी रेल्वेत पार्सल हमाल म्हणून काम करत आहे. माझा रोहिदास याचा या पत्राशी काेणताही संबंध नाही.










