नवी दिल्ली, दि. २१ - 'आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार करुन त्यांच्यावर अन्याय करीत आहोत, बाबासाहेबांना एका जातीपुरते म...
नवी दिल्ली, दि. २१ - 'आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार करुन त्यांच्यावर अन्याय करीत आहोत, बाबासाहेबांना एका जातीपुरते मर्यादित ठेवू नका', असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भुमीपूजन करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. 1956 मध्ये बाबासाहेब आपल्यातून गेले, आज 60 वर्षानंतर आपण स्मारक बांधायला सुरुवात करीत आहोत', अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्याप्रकारे सरदार पटेल यांनी राजकीय एकीकरणासाठी काम केले, त्याप्रमाणे बाबासाहेबांनीदेखील सामाजिक एकीकरणासाठी काम केलं. महिला हक्काच्या संदर्भात महिलांना समान हक्क मिळणार नसतील तर मी मंत्रिमंडळाचा भाग राहू शकत नाही असं सांगत बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते.
बाबासाहेब जर सरकारमध्ये राहिले असते तर मी जे आज करतो आहे ते त्यांनी 60 वर्षापुर्वीच केले असते. काही लोकांना आम्ही अजिबात आवडत नाही आणि आम्हाला पाहायला पण त्यांना आवडत नाही, त्यांना आजार होतो, आणि आजारात माणूस काहीही बोलतो, मनावरचा ताबा सुटतो असं म्हणत मोदींनी यावेळी विरोधकांवर टीका केली.
'वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा काही लोक आता आरक्षण जाईल असं बोलायला लागले, मात्र असं काहीच झालं नाही. दलित, आदिवसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागलेला नाही, मात्र जिथे आमची सत्ता आहे तिथे अजूनही खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. दलित, आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांचा आरक्षण अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही', असं सांगत मोदींनी आरक्षणाबाबतची सरकारची भुमिका स्पष्ट केली. 'बाबासाहेबांच स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे. कदाचित हे माझ्या नशिबात होतं'.
या स्मारकाचं उद्धाटन 14 एप्रिल 2018 रोजी करण्यात येणार असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.










