नवी दिल्ली - पंतप्रधानांनी लोकांना पाण्याचे महत्त्व जाणून बचतीचे उपाय अंगीकारण्याचे आवाहन केले. देशात अनेक भागांतील भूजलपातळी कमी हो...
नवी दिल्ली - पंतप्रधानांनी लोकांना पाण्याचे महत्त्व जाणून बचतीचे उपाय अंगीकारण्याचे आवाहन केले. देशात अनेक भागांतील भूजलपातळी कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सरकार पाच लाख शेततळी बांधणार असल्याचे सांगितले. मनरेगाअंतर्गत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्याशी संबंधित पाच स्थळांचा कशा पद्धतीने विकास केला जात आहे, याचा आढावा घेतला.
आकाशवाणीवर प्रसारित मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले, आम्ही पाच लाख तलाव, शेततळी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मनरेगाअंतर्गतही पाणीबचतीसाठी प्रोत्साहन दिले जाईल. गावागावांत पाणी बचत तसेच पावसाळ्यात थेंब थेंब बचत करण्यावर भर दिला जाईल. गावातील पाणी गावातच जिरावे यासाठी जनआंदोलनाचे स्वरूप यावे. यासाठी मोहीम कशा पद्धतीने राबवली जावी, त्यासाठी तुम्ही योजना तयार करा, सरकारच्या योजनांशी जोडले जा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. लोकांनी पाण्याचे महत्त्व समजून पाणी बचतीसाठी शक्य ते सर्व उपाय योजले जावेत. मोदी म्हणाले, देशात या क्षेत्रात दिशादर्शक कामे करणारी अनेक गावे, प्रगतिशील शेतकरी आहेत. मात्र, तरीही आणखी काम होणे अपेक्षित आहे.










