श्रीरामपूर - खिल्लारी वस्तीवरील रोहिणी रघुनाथ नालगोंडा (५५) या महिलेचा राहात्या घरात खून झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. सायंकाळी...
श्रीरामपूर - खिल्लारी वस्तीवरील रोहिणी रघुनाथ नालगोंडा (५५) या महिलेचा राहात्या घरात खून झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. सायंकाळी उशिरा पती कामावरून घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. रघुनाथ नालगोंडा (५९) हे पत्नी रोहिणी मुलीसमवेत खिल्लारी वस्तीवर राहतात.
सकाळी रघुनाथ नेहमीप्रमाणे शहरातील फायनान्स कंपनीत कामासाठी गेले. मुलगी दुपारी महाविद्यालयात गेली. सायंकाळी उशिरा दोघे परतले. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडला असता रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगडी वरवंटा होता. डोक्यात वरवंटा घालून खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव, उपअधीक्षक राकेश ओला, निरीक्षक राजेश पडवळ यांनी घटनास्थळी भेट दिली. नगर येथून श्वानपथक पाचारण करण्यात आले. खून कोणी केला त्यामागे कारण काय, याबाबत तपासाअंतीच समजेल, असे निरीकक पडवळ म्हणाले. रात्री उशिरापर्यंत शवचिकित्सेसाठी मृतदेह पाठवलेला नव्हता. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.










