भाजपचे देवगावकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र नगरचे सुपुत्र असलेले दिवंगत संसदपटू प्रा. मधू दंडवते यांचे उचित स्मारक राज्य सरकारन...
भाजपचे देवगावकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नगरचे सुपुत्र असलेले दिवंगत संसदपटू प्रा. मधू दंडवते यांचे उचित स्मारक राज्य सरकारने उभारावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदा देवगावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाने ग्रामविकास नगरविकास विभागाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
देवगावकर यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये पाठवलेल्या पत्रात म्हटले होते, प्रा. दंडवते यांच्यासारख्या नि:स्पृह, प्रखर बुद्धिमान सर्व पक्षांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राचा आपल्याला विसर पडला आहे. मूळचे नगरचे असलेल्या प्रा. दंडवते यांनी कोकणातील राजापूर मतदारसंघातून दीर्घकाळ संसदेत प्रतिनिधीत्व केले. आणीबाणीत लालकृष्ण अडवाणींबरोबर ते १८ महिने बंगळुरू येथील तुरुंगात होते. मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये प्रा. दंडवते यांनी रेल्वेमंत्री नंतर विश्वनाथ प्रतापसिंग सरकारमध्ये अर्थमंत्रिपद भूषवले. देवेगौडा सरकारमध्ये ते योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. कोकण रेल्वे ही त्यांनी कोकणाला दिलेली देणगी आहे. त्यासाठी त्यांनी २० वर्षे लढा दिला. कर्मवादावर विश्वास असल्याने ते प्रसिद्धीपासून मात्र दूर राहिले. प्रा. दंडवते हे महाराष्ट्राचे भूषण होते. त्यामुळे त्यांचे उचित स्मारक उभारण्यात यावे, कोकण रेल्वेच्या एका गाडीला त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच त्यांच्या नावाने एखादी कल्याणकारी योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी देवगावकर यांनी केली होती. तीन महिन्यांनंतर देवगावकर यांच्या या पत्राची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाने गृह विभाग, नियोजन विभाग, ग्रामविकास नगरविकास विभागाला याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.










