मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचा समारोप येत्या ११ एप्रिलला काँग्रेसतर्फे साजरा कर...
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचा समारोप येत्या ११ एप्रिलला काँग्रेसतर्फे साजरा करण्यात येणार आहे. ही जयंती नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरील विशाल जाहीर सभेच्या माध्यमातून होणार असून या सभेसाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी दिली.
या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी चव्हाण यांनी सिव्हिल लाइन्स स्थित राणीकोठी येथे विदर्भातील प्रमुख नेत्यांची बैठकही आयोजित केली होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य विलास मुत्तेमवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. महाराष्ट्रातही अनेक कार्यक्रम करण्यात आले. या वर्षाचा राष्ट्रीय स्तरावरील समारोपाचा कार्यक्रम ११ एप्रिलला नागपूर येथे आयोजित करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने घेतला आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी महाराष्ट्राला व दीक्षाभूमीमुळे पावन झालेल्या नागपूरला मिळणे, ही प्रदेश काँग्रेससाठी आनंदाची बाब असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.










