पोलिसांकडून 'अत्याचार प्रकरणी दिलेला जबाब बदलण्यासाठी मारहाण होत असल्या प्रकरणी यापुढे पोलीस चौकशीला आले तर गळफास घेईन', असा...
पोलिसांकडून 'अत्याचार प्रकरणी दिलेला जबाब बदलण्यासाठी मारहाण होत असल्या प्रकरणी यापुढे पोलीस चौकशीला आले तर गळफास घेईन', असा जबाब अत्याचारित मुलीने सोमवारी येथे पोलिसांना दिला. तिने रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून आत्महत्त्येचे कारण जाणून घेतले.
श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला परिसरातील चार नराधमांनी एका सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल आहे. या मुलीने रविवारी (दि. ६) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यापूर्वी दिलेला जबाब बदलण्यासाठी आपणाला पोलिसांकडून मारहाण होत आहे' अशी तक्रार मुलीने जबाबात केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी व उपनिरीक्षक भरत मोरे यांनी ही मारहाण केल्याची तक्रार मुलीने व तिच्या नातेवाईकांनी यापूर्वीही केली आहे.
दरम्यान, मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. जबाब बदलण्यासाठी मुलीला पोलिसांनी मारहाण केल्याचा जो आरोप झाला त्याची चौकशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याबाबत चौकशी सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.










