नगर - शैक्षणिक प्रगती करत असतांना विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रातही नव्याने संधी निर्माण झाल्या आह...
नगर - शैक्षणिक प्रगती करत असतांना विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी आहे. त्याचबरोबर कला क्षेत्रातही नव्याने संधी निर्माण झाल्या आहेत. मुलींना संगीत व नृत्य कलेचे प्रशिक्षण मिळावे. नृत्य व गायन कलेच्या क्षेत्रात सर्वसामान्यांच्या मुली फारशा दिसत नाहीत. या क्षेत्रात विशिष्ट समाजाने, समुदायाने मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. ती मोडीत काढून मुलींनी कला क्षेत्रात प्रवेश करावा असे आवाहन आष्टी तालुक्याचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी केले.
वाहिरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमा दरम्यान ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. संत शिरोमणी शेख महंमद महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र वाहिरा येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतून हजारो भाविक यात्रेस उपस्थित होते.
याप्रसंगी ह.भ.प. भगवानदास घुगे शास्त्री म्हणाले, शेख महंमद महाराज हे मानवतेचे पुजक असून हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतिक होते. आपल्या साहित्यातून त्यांनी यज्ञ, याग, कर्मकांड झुगारुन विवेकवादी दृष्टीकोन अंगिकारण्याचा मार्ग सांगितला. आजच्या जमान्यात मात्र शेख महंमद महाराजांना विशिष्ट समाजाच्या चौकटीत अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याचेच औचित्य साधत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रप्रमुख दळवी सर यांनी शाळा आयएसओ नामांकन मिळवण्याच्या दृष्टीने प्रय़त्न करण्याचा सल्ला देत पाच हजार रुपयाचा धनादेश शाळेसाठी दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले नृत्यअविष्कार सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी सरपंच केशरबाई आटोळे, रोहिदास झांजे, जब्बर महाराज शेख, अब्दुल महाराज शेख, शिवाजी झांजे, छबुराव दळवी, ज्येष्ठ विचारवंत भगवानदास घुगे श्सत्री, ह.भ.प.सिध्दीनाथ मेटे महाराज, पत्रकार महादेव गवळी, अॅड.मधुकर झांजे, भाऊसाहेब झांजे, बबन पगारे, आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. कार्य़क्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामविकास ग्रुप वाहिरा, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक केंद्रप्रमुख दळवी सर यांनी तर सुत्रसंचालन रोमाडे सर यांनी केले.










