११५ अर्जांची विक्री : राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी अकोले : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली...
११५ अर्जांची विक्री : राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊगर्दी
अकोले : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला उधाण आले आहे. गुरुवारपर्यंत ११५ अर्जांची विक्री झाली, पण एकही अर्ज दाखल झाला नाही. ११ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
१८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या निर्मितीपासून माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात सत्ता असून मध्यंतरी एकदा सर्वपक्षीय संचालक मंडळ सत्तेत होते. गत सदस्य मंडळास ३ वर्षे विविध कारणास्तव मुदतवाढ मिळाली. या निवडणुकीसाठी तरुणाई सरसावली असून इच्छुकांच्या गर्दीमुळे गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयाला जत्रेचे स्वरुप आले होते. भाजपा व सेनेने एकला चलोचा नारा दिल्याने राष्ट्रवादीकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
अगस्ती साखर कारखाना, अमृतसागर दूध संघ, नगरपंचायत यांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या, त्यात संधी न मिळालेले इच्छूक आता समितीसाठी प्रयत्नशील आहेत. विरोधकांची मोर्चेबांधणी झाल्यास राष्ट्रवादीपुढे सत्ता अबाधित ठेवण्याचे आव्हान उभे राहू शकते. माजी मंत्री मधुकर पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, सचिव यशवंत आभाळे यांनी गुरुवारी दिवसभर इच्छुकांची मते जाणून घेतली. भाजपदेखील बाजार समितीसाठी सरसावली असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी उमेदवार जुळवाजुळवी सुरु केली आहे. सेनेचीही मोर्चेबांधणी सुरु आहे. माजी संचालकांपैकी एकमेव राजेंद्र गवांदे पुन्हा इच्छूक दिसत असून इंदोरीचे विकास देशमुख, शेरणखेलचे भाऊसाहेब कासार उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.










