श्रीगोंदा - तालुक्यातील तांदळी दुमाला येथील दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना अटक करावी तसेच अत्याचारित मुलीला झालेल्या मारहाणीच्या ...
श्रीगोंदा - तालुक्यातील तांदळी दुमाला येथील दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना अटक करावी तसेच अत्याचारित मुलीला झालेल्या मारहाणीच्या चौकशीच्या मागणीसाठी लोकअधिकार आंदोलनाच्या वतीने मंगळवारी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंत्री शिंदे यांच्या प्रेमदान चौकातील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुभाष शिंदे, प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्रीगोंदे तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एका अल्पवयीन दलित मुलीवर काही सवर्ण युवकांनी अत्याचार केले. आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांना अटक करुन मारहाण केली. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांना अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
श्रीगोंदे तालुक्यातील वडाळी येथील महिलेची काहीजणांनी विवस्त्र धिंड काढून मारहाण केली. या प्रकरणाची नोंद करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर पाच दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. या पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली अाहे. पोलिस निरीक्षक बजरंग बनसोडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
"पोस्टर बॉईज' स्टाइल आंदोलन - "पोस्टरबॉईज' या चित्रपटात आपल्या मागण्यांसाठी अशा प्रकारचे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर लोकअधिकार आंदोलनाचे संस्थापक अरुण जाधव यांनी आंदोलन करुन महिलांवरील अत्याचार रोखण्याची मागणी केली. श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे वादग्रस्त निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांची बदली करण्याची मागणीही त्यांनी केली.










