नगर - आपण ज्या शाळेत शिकलो त्याची जाण ठेवून आपल्या उज्वल काळात त्या शाळेसाठी तन-मन-धनाने योगदान करणारे व्यक्ति अगदीच मोजकेच. 1984 स...
नगर - आपण ज्या शाळेत शिकलो त्याची जाण ठेवून आपल्या उज्वल काळात त्या शाळेसाठी तन-मन-धनाने योगदान करणारे व्यक्ति अगदीच मोजकेच. 1984 साली स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या हिंगणगांव हायस्कूलला नुकतेच 50 वर्षे पुर्ण झाले. या शाळेची सध्याची स्थिती पाहता ही शाखा पटाअभावी विसर्जित करावी लागेल व त्याच्या इमारतही खूप जीर्ण झालेत अशा अवस्थेत या शाळेतील माजी विद्यार्थी व त्यांच्या संघाने हिंगणगाव हायस्कूलचे केलेले कायापलट पाहून खूप विशेष वाटले. निश्चितच या विद्यार्थ्यांनी केलेले हे कार्य़ सर्वच शिक्षण संकुलासाठी प्रेरणादायी आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्या मिनाताई जगधानी यांनी व्यक्त केले.
याच शाळेत शिक्षण घेऊन नामवंत डॉक्टर म्हणून जिल्ह्यात सुप्रसिध्द असणारे हृदयरोगतज्ञ डॉ.बापूसाहेब कांडेकर, आयुर्वेद योगतज्ञ डॉ.सुनिलराव गंधे, सुप्रसिध्द सोनॉलाजीस्ट डॉ.पोपटराव कर्डिले व ईएनटी सर्जन डॉ.दिलीप पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन याच विद्यालयाच्या सुमारे 3000 माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा जिर्णोध्दार करण्याचे ठरविले. सुमारे 1 कोटी निधी संकलीत करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून, व्यवहारात पारदर्शिता यावी म्हणून हिंगणगाव माजी विद्यार्थी पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे. अशी माहिती सुनिल गंधे यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.










