नगर - वाडिया पार्कच्या मैदानावर अ.नगर जिल्हा क्रिकेट असो. व मनपा यांच्या वतीने अहमदनगर प्रिमियर लिग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत ईशव...
नगर - वाडिया पार्कच्या मैदानावर अ.नगर जिल्हा क्रिकेट असो. व मनपा यांच्या वतीने अहमदनगर प्रिमियर लिग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत ईशवेद वॉरियर्स व न्यू ऐरा कमांडोज, तसेच क्वेरा चॅलेंजर्स व सोहम सुपरकिंग्जमध्ये सेमी फायनलचा सामना चांगलाच रंगला होता. या लढतीत ईशवेद वॉरियर्स व क्वेरा चॅलेंजर्सने शानदार विजय संपादन केला. त्यांच्यात सोमवारी सायंकाळी 6 वाजता अंतिम लढत होणार आहे.
ईशवेद वॉरियर्सने नार्णेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यू ऐरा कमांडोजच्या संघाने 16.3 षटकांत सर्वबाद 117 धावांचे आव्हान ईशवेदसमोर ठेवले. या बदल्यात ईशवेदने 8 गडी गमावून 19.4 षटकांत लक्ष्य पार करीत सामना जिंकला. न्यू ऐराच्या संदीप आडोळेने 51 धावा, पंकज सातपुते 30 धावा केल्या. ईशवेदच्या मोहसीन सेफी याने 39 धावा, सचिन धायगुडे याने 21 धावा केल्या. मोहसीन सेफी हा मॅन र्ऑें द मॅचचा मानकरी ठरला.
सोहन सुपरकिंग्जने नार्णेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत 19.1 षटकांत सर्वबाद 126 धावा केल्या. क्वेरा चॅलेंजर्सने हे आव्हान लिलया पेलवत केवळ 19.4 षटकांत 4 बाद होत 130 धावा करून सामना जिंकला. सोहमच्या इम्रान मलिकने 37, पंकज वाकचौरे 35, असीम काझी 16, निलेश पटेल 13 धावा केल्या, तर क्वेराचा श्रीपाद निंबाळकरने नाबाद 57 धावा केल्या. यश कासलीवालने 34 धावा, अमान खान याने नाबाद 18 धावा करून संघास विजय मिळवून दिला. श्रीपाद निंबाळकरने नाबाद 57 धावा करून 2 बळी घेतल्याबद्दल त्यास मॅन र्ऑें द मॅच म्हणून घोषित करण्यात आले.
सेमी फायनलचे दोन्ही सामने अटीतटीचे होत शेवटच्या षटकांपर्यंत चालले. कोण जिंकते याकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते. उत्सुकता ताणली गेली. अखेर ईशेवद व क्वेरा संघाने विजय संपादन करून फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. न्यू ऐरा कमांडोजने याअगोदरचे सर्व सामने जिंकले. मात्र, सेमी फायनलचा सामना खराब क्षेत्ररक्षणामुळे त्यांनी गमावला, याची उपस्थितांनी खंत व्यक्त केली. अनुपम संकलेचा याने पाठीशी असलेल्या अनुभवाच्या बळावर सामना जिंकण्यासाठी मोठी मेहनत घेतली व त्यात तो यशस्वी झाला.
ईशवेदचे संदीप बोरा व क्वेरा चॅलेंजर्सचे राहुल धापटकर यांनी फायनल सामन्यासाठी क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.










