अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडातील तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कु...
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडातील तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी बुधवारी फेटाळले आहेत. त्यामुळे जवखेडे हत्याकांड खटल्याच्या नियमित सुनावणी प्रक्रियेतील अडथळा दूर झाला आहे.
राज्यभरात गाजलेल्या जवखेडे हत्याकांडातील आरोपी प्रशांत जाधव, अशोक जाधव आणि दिलीप जाधव सध्या कारागृहात आहेत. हत्याकांडाची संपूर्ण चौकशी झाली असल्याने कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद करीत आरोपींनी दोन महिन्यांपूर्वीच जामिनासाठी अर्ज केला होता.
नार्को चाचणी बळजबरीने घेतल्याने हत्याकांडात गोवल्याचे आरोपींनी अर्जात म्हटले होते. त्यावर गत महिन्यात युक्तीवाद झाला. विशेष सरकारी वकील अँड. उमेशचंद्र यादव यांनी भक्कम युक्तीवाद, सर्वोच्च न्यायालयांचे निवाडे आणि पुरावे सादर करून आरोपींना जामीन देण्यास विरोध केला. त्यावर गत महिन्यात सुनावणी झाली.
बुधवारी न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. तिघांविरुद्ध दोषारोपपत्र सादर झालेले असल्याने आणि जामीन अर्ज फेटाळल्याने आता या खटल्याच्या नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नार्को चाचणी ही आरोपींच्या संमतीने आणि खुल्या वातावरणात घेतली होती. त्यामुळे बळजबरीने चाचणी घेतली आहे, असे म्हणणे असंयुक्तिक असल्याचे अँड. यादव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.










