लालटाकी परिसरातील अप्पू हत्ती चौकाजवळ असणाऱ्या 10 दुकांनाना शुक्रवारी मध्यरात्री 1.30 ते 2 च्या सुमारास आग लागली. ही आग शनिवारी सकाळ 7 ...
लालटाकी परिसरातील अप्पू हत्ती चौकाजवळ असणाऱ्या 10 दुकांनाना शुक्रवारी मध्यरात्री 1.30 ते 2 च्या सुमारास आग लागली. ही आग शनिवारी सकाळ 7 ते 7.30 पर्यंत आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी 1 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेच्या वेळी अग्निशामक बंनांना बोलावण्यात आले. अग्निशामक दलांना आग विझविण्यात यश मिळाले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, लालटाकी चौकातील अप्पू हत्ती पुतळ्यासमोर असलेल्या दुकानांना शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. लालटाकी परिसरात कार केअरची दुकाने ऑटो गॅरेजेस आहेत. यापैकी श्री कार केअर नावाच्या दुकानाला आग लागली. या दुकानात काम करणारा कामगार विश्वकर्मा त्याचा भाऊ झोपले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास या दुकानासह शेजारच्या चांदणे यांच्या दुकानाला आग लागली. विश्वकर्मा याने तत्काळ मालकांना पाचारण केले. नंतर त्यांनी अग्निशमन विभागाला कळवले. तोपर्यंत तोफखाना पोलिसही घटनास्थळी आले होते. श्री कार केअरच्या शेजारी असलेली इतर दुकाने गॅरेजेसही या आगीच्या तडाख्यात सापडली. या भागात फर्निचरचे दुकान असल्याने मोठय़ा प्रमाणात सागवानी लाकडे तसेच आंबा, बाभुळ यांची लाकडे बाहेरच पडलेली होती. आग लागताच या लाकडांनी पेट घेतला. त्यामुळे काही क्षणातच आगीचे रौद्ररुप धारण केले. या आगीत फर्निचर दुकानातील लाकडी सामान व फायबरचे साहित्य जळून खाक झाले. तसेच त्याशेजारी असलेल्या कार रिपेअर गॅरेजमधील दुकान, कार्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तसेच सायकलच्या दुकानातील सायकली जळून खाक झाल्या. ही आग पाहताच परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. अग्निशामक दलाच्या बंबाने तत्काळ घटनास्थळी येवून पाण्याचा तुफानी मारा केल्याने आग विझविण्यात यश मिळाले. मात्र तोपर्यंत सुमारे १ कोटींचे नुकसान झाले होते. या आगीची माहिती समजताच महापालिका, एमआयडीसी, राहुरी तसेच एसी डिपार्टमेंटचे अग्निशामक बंब घटनास्थळी बोलविण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, तोफखान्याचे पोनि. अविनाश मोरे तसेच पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र ही आग कशामुळे लागली, याचे निश्चित कारण अद्यापि समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशामक विभागातील शंकर मिसाळ, बाळासाहेब घोरपडे, अशोक पठारे, रंगारी, बाळासाहेब घाटविसावे, दत्तात्रय शिंदे, शिवाजी कदम, रामचंद्र धाडगे, राजेंद्र कांडेकर या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.











