नगर -न्यू आर्टस्, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयातर्फे केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 वर चर्चा करण्यात आली. यंदा प्रथमच सदरील कार्यक्रम...
नगर -न्यू आर्टस्, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयातर्फे केंद्रीय अर्थसंकल्प 2016-17 वर चर्चा करण्यात आली. यंदा प्रथमच सदरील कार्यक्रमाचे आयोजन नवीन ऑडिटोरियममध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पाटील हे होते. तसेच सदरील चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी जी.डी.खानदेशे होते. मंचावर संस्थेचे खजिनदार रा.ह.दरे, सहसचिव ऍड.दीपलक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त रामनाथ वाघ होते.
बजेट विषयी बोलताना कर सल्लागार प्रकाश झावरे यांनी सांगितले की, 2016-17 च्या बजेटने मध्यमवर्गीयांना फारसे काहीही दिले नसले तरीही भविष्यनिर्वाह निधी रक्कम मात्र करपात्र असेल अशा चांगल्या गोष्टीची तरतूद केली तसेच कृषी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. सदरील चर्चासत्रामध्ये माजी प्राप्तीकर अधिकारी जयंतराव पारनाईक, ऍड.अशोक गांधी, सीए उत्तमराव कदम यांनी अर्थसंकल्पबाबत आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांना व शहरातील नागरिकांना निश्चितच फायदा होईल हे स्पष्ट केले. तसेच समाजातील प्रत्येक घटकाने आपणास या अर्थसंकल्पातून काय मिळाले हे पाहण्यापेक्षा समाजातील प्रत्येक घटकांचे हीत कसे साध्य झाले पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य आर.जी.कोल्हे यांनी केले तर आभार डॉ.एम.व्ही.गिते यांनी मानले. उपप्राचार्य एस.एस.जाधव, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मुकेश मुळे, डॉ.ए.एस.राजू, एम.एम.तांबे आदिंसह विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, प्राध्यापक, शिक्षकतेर कर्मचारी उपस्थित होते.









