बारागाव नांदूर : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्या डंपरखाली आल्य...
बारागाव नांदूर : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणार्या डंपरखाली आल्याने पाच वर्षांच्या मुलाचा चिरडून अंत झाला. अपघातानंतर मद्यधुंद चालक व क्लिनर पळून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकर्यांनी डंपरची तोडफोड केली.
वाररथ रस्त्यावरून रोकडेश्वर परिसरात खडीने भरलेला एम एच १४ एएस हा डंपर भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी विशाल संजय बर्डे (वय ५) हा बालक डंपरखाली सापडून जागीच ठार झाला. जमाव जमा होण्यापूर्वीच चालक व क्लिनर दोघेही पळून जाण्यास यशस्वी झाले. संतप्त गावकर्यांनी डंपरची हवा सोडून देत काचा फोडल्या.माजी सभापती शिवाजीराव गाडे यांनी गावकर्यांशी संवाद साधून शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर जमाव शांत झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डंपर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आला. शोकाकुल वातावरणात विशालवर उशिराने अंत्यसंस्कार करण्यात आले.










