नगर - मुलींचा जन्मदर चिंताजनक असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये नगरचा समावेश झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये आता केंद्र सरकारने सुरु ...
नगर - मुलींचा जन्मदर चिंताजनक असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये नगरचा समावेश झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये आता केंद्र सरकारने सुरु केलेली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजना सुरू आहे. मुलींच्या घसरत जाणाऱ्या जन्मदरात सुधारणा करण्यासाठी नागरिकांत जनजागृती, कुटुंबांचे समुपदेशन, स्त्री जन्माचे स्वागत यांसारखे उपक्रम राबविल्याने जन्मदरात गेल्या पाच महिन्यात सुधारणा झाल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे. मुलींच्या संख्येत घट होत असल्याने जनजागृतीच्या विविध योजना सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभागाकडून राबविल्या जात आहेत. महिला बालकल्याण विभागाकडून पंचायत समित्यांच्या प्रत्येक गणात कन्यारत्न उत्सव उपक्रम सुरू केले आहेत. स्त्री जन्माचे स्वागत, एक हजार कुटुंबांचे समुपदेशन, पथनाट्ये, प्रभात फेऱ्या यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. मागील पाच महिन्यांच्या काळात या मध्ये सातत्य ठेवण्यात आल्याने मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत सुधारला आहे. मागील जानेवारी महिन्यात 1 हजार 792 मुले जन्मली तर 1 हजार 888 मुली जन्मास आल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यावरुन जिल्ह्यात सप्टेंबर 2015 पासून मुलींच्या जन्मदरात सुधारणा होत असल्याचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी सांगितले. दरम्यान, महिला बालकल्याण व आरोग्य विभाग या दोन्ही विभागांनी मागील वर्षातील जुलै महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावांतील मुलींच्या जन्माची माहिती घेतली. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण 1 हजार 462गावांपैकी अवघ्या 666 गावांमध्ये मुलींचे प्रमाण नऊशेपेक्षा आधिक असल्याचे दिसून आले. उर्वरीत 716 गावांत मुलींचे प्रमाण नऊशेच्या आत असल्याने जन्मदराबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आदेश सीईओंनी दिले होते. त्यानुसार प्रयत्न करण्यात आले, गावांतील गरोदर महिला असलेल्या एक हजार कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.










