कर्जत - कुकडीच्या पाण्याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असताना कर्जत तालुक्यातून वाहणार्या कुकडीच्या मुख्य चारीला आज नांदगाव येथे मोठे भगदाड पड...

कर्जत - कुकडीच्या पाण्याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असताना कर्जत तालुक्यातून वाहणार्या कुकडीच्या मुख्य चारीला आज नांदगाव येथे मोठे भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. तसेच अनेक शेतकर्यांची शेती वाहून गेली.कुकडीच्या जलसेतूचा भराव पाण्याच्या अति दाबाने वळणावर फुटल्याने ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तशी अवस्था झाली आहे. या आपत्तीमध्ये परिसरातील अनेक शेतकर्यांची शेती वाहून गेली असून, या भागात पूर सदृश्य़ स्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य दुष्काळी परिस्थितीला अत्यंत धीराने तोंड देत असताना पाण्याचे कुठलेही स्त्रोत शिल्लक राहिलेले नसताना एकमेव आशा असलेल्या कुकडीच्या पाण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज येणार उद्या येणार असे करत अखेरीस कुकडीचे पाणी कर्जत तालुक्यात दाखल झाले व करमाळा तालुक्यातील मांगी तलावाकडे झेपावत असताना अचानक १८१ किमीवरील नांदगाव येथील जलसेतूजवळील वळणावरील मातीचा भराव फुटून २0 फुटाचे भगदाड या ठिकाणी पडले. यामुळे मुख्य चारीचे पाणी नांदगावच्या ओढ्यात जाऊ लागले, या पाण्याचा वेग इतका जास्त होता की काही वेळात येथील ओढ्यासह आसपासच्या शेतात जिकडे तिकडे पाणी पाणीच झाले नांदगाव येथे मुख्य चारीला पाणी वाहून नेण्यासाठी जलसेतू बांधण्यात आलेला आहे. मात्र, या जलसेतूच्या तोंडावर वळण आहे. त्यामुळे मुख्य चारीतून आलेले पाणी येथील वळणावरील भरावावर जोरात आदळत असे व तेथून या जलसेतूत जात होते, त्यामुळे पाण्याचा वेग याठिकाणच्या भरावाला सहन न झाल्याने मोठे भगदाड पडले. ही माहिती एका नागरिकाने गावात जाऊन दिली. यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. याठिकाणी कुकडीचे अधिकारी आले होते त्यांनी पाहणी केली व जेसीबी लावून हा भराव भरून काढण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान हे पाणी भोसेखिंड बोगद्यातून सीना धरणात वळविण्यात आले आहे.









