नगर- अहमदनगर येथील भुमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने 10 एप्रिल भुमापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा अधिक्षक महेश शिंदे यांच्या ...
नगर- अहमदनगर येथील भुमि अभिलेख कार्यालयाच्यावतीने 10 एप्रिल भुमापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा अधिक्षक महेश शिंदे यांच्या हस्ते भुमापन यंत्र, 7/12 उतारे व वह्यांची पूजा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीची जाणिव ठेवून इतर कार्यक्रमास मात्र संपूर्णत: फाटा देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भुमि अभिलेखा संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश कोदे यांनी सर्वांचे स्वागत केले.
अधिक्षक शिंदे यांनी भुमापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, 1823 साली ब्रिटीशांनी भारताच्या सर्व्हेचे काम सुरु केले. कर्नल विंगेट व प्रिंग्ले यांनी प्रथमत: या कामास प्रारंभ केला. 1930 पर्यंत म्हणजे 125 वर्षे हे भुमापनाचे काम सुरु होते. त्यानंतर जमिनीचे प्लॉट पाडणे, सर्व्हेनंबर देणे, क्षेत्र, आकार ठरविणे अशा माध्यमातून सर्व कामे होवून त्यांचे 7/12 चे उतारे सुरु झाले. जागेचे कोणतेही काम असो, उदा, पूल, रेल्वे, विमानतळ, घर इत्यादी कामे ही भुमापनाशिवाय होवूच शकत नाहीत. सध्या भुमि अभिलेख खात्यामध्ये कर्मचार्यांची अनेक पदे रिक्त आहेत, व मनुष्यबळही कमी आहे. तरीपण, भुमी अभिलेख खात्याने यंदाच्यावर्षी चांगले काम केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अधिक गतीने काम होण्यासाठी खात्यातील प्रत्येक सर्व्हेअरला टोटल स्टेशन मशिन्स् (इलेट्रॉनिस) मिळावीत, अशी आशा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
एव्हरेस्ट या जगातील उंच शिखराविषयी बोलताना श्री.शिंदे यांनी गमतीदार गोष्ट सांगितली, जॉर्ज एव्हरेस्ट नावाच्या एका सर्व्हेअरने चेन, साखळी व शंकुचा वापर करुन या उंच शिखराचे मापन केले होते, आज त्यामुळेच या शिखराचे नाव माऊंट एव्हरेस्ट असे पडले असल्याचे त्यांनी सांगितले.
आज भुमिभिलेख खाते हे वेगवेगळ्या स्थित्यंतरातून मार्गक्रमण करत आहे, आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, इलेट्रॉनिक मशिनद्वारे म्हणजेच ईटीएस (इलेट्रॉनिक टोटल स्टेशन) व जीपीएस (ग्लोबल पोझिशन सिस्टीम) च्या माध्यमातून मोजमापनाचे सर्वत्र कामे सुरु आहेत, त्यामुळे वेळ वाचला आहे, परंतु कामाची व्याप्ती निश्चितच वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. भुमी अभिलेख खात्यामध्ये अनेक कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे मनुष्यबळ कमी झालेले असल्याने शासनाने ही पदे लवकरात लवकर भरावीत, त्यामुळे या खात्याच्या कामास जलद गती येईल, अशी आशा व्यक्त केली.









