नवी दिल्ली - विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना श्रीहरी अणेंवर शाई फेकण्य...
नवी दिल्ली - विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्वतंत्र विदर्भ राज्य मागणीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना श्रीहरी अणेंवर शाई फेकण्यात आली. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात एवढी शाई नाही की त्याने विदर्भ राज्याचा आवाज दाबल्या जाऊ शकेल. आम्ही शांततेच्या मार्गानेच विदर्भ राज्य मागत आहोत. परंतु तुम्ही शाई फेकून आमच्या विधायक मागणीच्या वाकड्यात शिरणार असाल तर आमच्या हातावरच्या शार्इचे प्रत्युत्तर तुमच्या हातावर रक्ताने दिसेल, असा खणखणीत इशारा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी दिला. स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. त्यावर अणे यांनी हा पवित्रा घेतला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड. वामनराव चटप, राम नेवले, अॅड. नंदा पराते यांनी जंतरमंतरवर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले. यात अॅड. श्रीहरी अणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, भाजपचे खासदार नाना पाटोले अन्य विदर्भवादी संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. श्रीहरी अणे विदर्भावर अन्याय कसा झाला याचा लेखाजोखा मांडत असताना नितेश राणे यांच्या स्वाभीमानी संघटनेचे कोल्हापूरचे सचिन तोडकर प्रशांत भदाना यांच्यासह चार पाच कार्यकर्त्यांनी मंचाजवळ येऊन घोषणाबाजी करीत अणेंच्या अंगावर शाई फेकली. त्यामुळे गोंधळ उडाला. संतप्त विदर्भवादी कार्यकर्त्यांनी राणेंच्या कार्यकर्त्यांना चोपून काढले. पोलिसांनी राणेंच्या कार्यकर्त्यांचा बचाव केला घटनास्थळावरून सुरक्षित बाहेर नेले. अणेंनी खंडीत भाषण पुढे नेताना इच्छाच असेल तर शाईचे प्रत्युत्तर रक्ताने देऊ, असे सांगत यापुढे शहाण्यांसारखे वागा, असा सल्लाही दिला.










