निघोज - संपूर्ण राज्यात नावलौलीक असलेल्या निघोज येथील मळगंगादेवीच्या यात्रा उत्सवाला दिनांक २१ पासून उत्साहास सुरुवात झाली. निघोज पंचक्...
निघोज - संपूर्ण राज्यात नावलौलीक असलेल्या निघोज येथील मळगंगादेवीच्या यात्रा उत्सवाला दिनांक २१ पासून उत्साहास सुरुवात झाली. निघोज पंचक्रोशीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन मळगंगादेवीला लावण्यात येणाऱ्या हळदीची दुपारी ४ वाजता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी देवीचा जयजयकार करण्यात आला. मिरावणुकी नंतर मळगंगादेवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन हजरो महिलांनी मळगंगादेवीला हळद लावली. मळगंगादेवीला हळद लावण्यासाठी निघोज पंचक्रोशीतील सर्व महिला आवर्जून दरवर्षी येत असतात. याही वर्षी जवळपास तीन हजार महिलांनी मळगंगा देवीला हळद लावण्याच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. मळगंगादेवीला हळद लावण्याच्या कार्यक्रमपासूनच निघोजच्या यात्रेचा प्रारंभ होतो.दुसऱ्या दिवशी मळगंगादेवीच्या मानाच्या ८५ फूट उंचीच्या काठीची मिरवणूक होते. या दहा दिवसाच्या यात्रा काळात निघोजची मंडळी सर्व शेतीची कामे बंद ठेऊन मोठ्या भक्तीभावाने यात्राउत्सवात सहभागी होतात. दरम्यान ३० एप्रिलला देवीला आंबील वर्तवण्यात येते, दिनांक १ मे रोजी देवीच्या चांदीच्या घागरीची मिरवणूक होणार आहे.यात्रेला सुमारे आठ लाख भाविक दूरवरून येत असतात. या भाविकांसाठी पाटबंधारे खाते व जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पारनेर व शिरूर एसटी आगराकडून दिनांक २८ पासून कुंडाकडे जाण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली आहे. मळगंगा ग्रामिण विकास ट्रस्ट, निघोज ग्रामपंचायत, निघोज व मुंबईकर मंडळ, विविध सेवाभावी संस्था व सर्व मित्रमंडळे यांच्याकडून भविकांकरता सोईसुविधा पुरविण्याचे काम होत असल्याने लाखो भाविकांना कोणत्याही प्रकारची उणीव जाणवणार नाही, तसेच सर्व भाविकांना मळगंगादेवी यात्रा उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.











