नगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. या हगाम्यात बुर्हाणनगरचा पहिलवान सोमनाथ राऊत...
नगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. या हगाम्यात बुर्हाणनगरचा पहिलवान सोमनाथ राऊत यांनी अतिशय र्सेंाईदार खेळ करीत विजेतेपदाची मानाची चांदीची गदा पटकावली. याबद्दल पै. सोमनाथ राऊत याचा बुर्हाणनगर ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता तापकिरे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सागर निमसे, गीताराम राऊत, बाळू जाधव, त्रिंबक कर्डिले, शरद कर्डिले, निखील शिंदे, अनिल कर्डिले, विकास मोकाटे, गणेश साळी, नागेश बागडे, समीर पठाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
बुर्हाणनगर गाव हे कुस्तीगीरांना प्रोत्साहन देणारे गाव आहे. या गावाने आतापर्यंत अनेक चांगले व नामवंत पहिलवान दिले आहेत. पै. सोमनाथ राऊत हा गरीब कुटुंबातील असून, त्याचे वडील व आजोबांनी कुस्ती क्षेत्रात नाव कमावले आहे. पै. सोमनाथ राऊत याने चांदीची गदा जिंकून विजेतेपद मिळविल्याबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी बोलताना श्री. तापकिरे म्हणाले की, पै. सोमनाथ राऊत याने बुर्हाणनगर गावचे नाव उज्ज्वल केले आहे. गावाला कुस्तीची परंपरा राहिली असून, सोमनाथने मिळविलेले यश नवोदित पहिलवानांना प्रेरणा देणारे आहे. कष्ट करण्याची तयारी व जिद्दीच्या पाठबळावर त्याने हे यश संपादन केले आहे, असे ते म्हणाले.










