नगर - राज्यातसर्वाधिक शौचालये बांधणारा नगर जिल्हा राज्यात अव्वलस्थानी पोहोचला आहे. सर्वाधिक शौचालये बांधून त्यांचा वापर करणारा ह...
नगर - राज्यातसर्वाधिक शौचालये बांधणारा नगर जिल्हा राज्यात अव्वलस्थानी पोहोचला आहे. सर्वाधिक शौचालये बांधून त्यांचा वापर करणारा हा एकमेव जिल्हा असल्याचे शासनाने घोषित केले. जिल्हा परिषदेने केलेल्या या कामाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, तसेच स्वच्छता पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत नुकताच गौरव करण्यात आला. जिल्ह्याला २०१५-२०१६ या वर्षात ४८ हजार ८६४ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. स्वच्छता पाणीपुरवठा विभागाने उद्दिष्ट ओलांडून वर्षभरात ५१ हजारांवर शौचालये बांधली. नगर आता राज्यात सर्वाधिक शाैचालये बांधणारा जिल्हा बनला आहे. पदाधिकारी, सदस्य, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळे हे शक्य झाल्याचे मत स्थायी समितीने नोंदवले आहे. जिल्ह्यात अस्मिता उपक्रम राबवण्यात आला. ११ हजार विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात आली. आकाशवाणीवर मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. सरपंचांची कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. या कामाची दखल घेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात नवाल बावके यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.










