पारनेर : पारनेर तालुक्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरु आहे. या यात्रांना मुंबई, पुणे, नगर, नाशिक येथून मोठय़ा प्रमाणात प्रवाशी ये-जा करीत आहे...
पारनेर : पारनेर तालुक्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरु आहे. या यात्रांना मुंबई, पुणे, नगर, नाशिक येथून मोठय़ा प्रमाणात प्रवाशी ये-जा करीत आहेत. हा हंगाम एस.टी.आगाराला फायदेशीर आहे. पण निघोजसह मोठय़ा यात्रांना गावाकडे जाण्या-येण्यासाठी बसेस वेळेवर सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. हमखास उत्पन्न मिळवुन देणार्या मुंबईच्या फेर्यांकडेही चालक-वाहकांनी दुर्लक्ष केल्याने ऐन गर्दीच्या हंगामात आर्थिक नुकसान वाढले आहे.
एस. टी. चालक किंवा वाहक नसल्याने रविवारी दुपारी पारनेर एस. टी. आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. यामुळे पारनेर-मुंबईसह पारनेर-शिरूर, नगर, बेल्हा मार्गावरील बसेस फलाटावरुन सुमारे एक ते दोन तास उशीराने सुटल्या. सध्या लग्नसराई, जत्रा, यात्रा साठी जाणार्या-येणार्या प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. पारनेर एस.टी.आगारात चालक व वाहकांची संख्या कमी असल्याने सद्यस्थितीत असणार्या चालक-वाहकांवरच एस..टी.चा कारभार आहे. रविवारी पारनेरचा आठवडे बाजार होता. त्यामुळे परिसरातील गावांमधून बाजारासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिक आले होते. मात्र, एस.टी. गाड्या नसल्यामुळे अनेकांना बसस्थानकावरच अडकून पडावे लागले. निघोज, वाळवणे, जातेगाव, पळवे व अनेक गावांच्या यात्रा असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होती. पण चालकच उपलब्ध नसल्याने सकाळी दहा, दुपारी बारा वाजताच्या पारनेर-मुंबई या बसेस दुपारी दीड वाजेपर्यंत फलाटावर आल्याच नव्हत्या. तर पारनेर-जामगाव-नगर, पारनेर-बेल्हा, पारनेर- कान्हुरपठार-टाकळी ढोकेश्वर, साकूर मार्गावरील बसेसदेखील समारे तासभर उशीरा धावत होत्या. पारनेर एस.टी. आगारात चालक- वाहकांची संख्या कमी असल्याने त्यांनाही कामाचा ताण वाढला आहे. असे दिसून येत आहे.









