ग्रामस्थांच्या पुढाकारातून सन १९९६ मध्ये गावातील परवानाधारक दारू दुकाने बंद करण्यात आली होती. गावातील दारुअड्डेही उद्ध्वस्त करण्यात आल...
ग्रामस्थांच्या पुढाकारातून सन १९९६ मध्ये गावातील परवानाधारक दारू दुकाने बंद करण्यात आली होती. गावातील दारुअड्डेही उद्ध्वस्त करण्यात आले होते. परंतु काही कालावधीनंतर हे अवैध धंदे पूर्ववत सुरू झाले. रामदास घावटे, रंजना पठारे व महिलांनी पुढाकार घेत गावात दारुमुक्त गाव संघर्ष समितीची स्थापना केली. समितीने गावातील अवैध धंद्याविरुद्ध लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे. जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथे बुधवारी आयोजित ग्रामसभेत महिला दारू, जुगार, मटका बंदीसाठी आक्रमक झाल्या. सभेत सुलाबाई वैरागर, आशाबाई शिंदे, कुसुम वैरागर, मीराबाई उमाप, शेवंता कोठावळे, भारती खुपटे, ठकूबाई खुपटे, रखमा चाबुकस्वार, हिराबाई जाधव या महिला अवैध धंद्यांविरुध्द आक्रमक झाल्या. गावातील दारू, जुगार अड्डे बंद होणार नसतील तर जवळे बसस्थानक परिसरात दारू विक्री सुरू करू, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी सरपंच संभाजीराव सोमवंशी बोलताना ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ पठारे यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. १९९६ पासून गावात दारुबंदी आहे. सध्या सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत पाठिशी राहील, असे आश्वासन उपसरपंच किसनराव रासकर यांनी दिले. सभेस रत्नमाला उदमले, शिवाजी धोंडिबा सालके, पोलीस पाटील बबनराव सालके, माजी सरपंच संभाजीराव सोमवंशी, ग्रामसेवक डी. जी. वाळके, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ हजर होते.










