मुंबई - भारतातील एकूण सतरा बँकांचे ९००० कोटींचे कर्ज बुडवून ब्रिटनला पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांला ईडीने तीन समन्स बजावूनह...
मुंबई - भारतातील एकूण सतरा बँकांचे ९००० कोटींचे कर्ज बुडवून ब्रिटनला पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांला ईडीने तीन समन्स बजावूनही ते मुंबईत ईडीच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाला नाही. कर्ज फसवणुकीशी संबंधित मनी लाँडरिंगची चौकशी करण्यासाठी विशेष न्यायालयाने मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
वसुली संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी संबंधित सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. आर. भावके यांनी सोमवारी मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. मल्यांनी तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यासाठी मेपर्यंतची वेळ मागितली आहे. जामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात ईडी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इंटरपोलला मल्ल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची विनंती करू शकते. सध्या मल्ल्या हे लंडन येथे असून या रेड कॉर्नर नोटीसनंतर मल्ल्या यांना त्यांच्या पासपोर्टवर कुठेही प्रवास करता येणार नाही. अनेक वेळा चौकशीसाठी बोलावूनही विजय मल्ल्या चौकशीकरता हजर राहत नाहीत. तसेच त्यांच्या कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी तपासकामी ईडीला सहकार्य करत नसल्याचे कारण पुढे करत अॅड. हितेन वेणेगावकर यांनी शुक्रवारी मल्ल्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती. तसेच आयडीबीआय बँकेने दिलेल्या या ९०० कोटींच्या कर्जाच्या रकमेतून ४३० कोटी खर्च करून मल्ल्या यांनी परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचेही ईडीच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र हा आरोप फेटाळून लावताना किंगफिशर कंपनीचे अॅड. अमित देसाई म्हणाले की, मल्ल्या यांनी बँकेच्या कर्जाचा कोणताही गैरवापर केलेला नाही. तसेच कंपनीचे अधिकारीही तपासाला पूर्ण सहकार्य करतात.
याच न्यायालयाने ईडीच्या दाव्याला आव्हान देणारी एक वेगळी याचिकाही त्यांनी फेटाळून लावली आहे. आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९०० कोटी रुपयांच्या कर्जातील ४३० कोटी रुपये बेकायदेशीररीत्या काढून मल्ल्यांनी परदेशात संपत्ती खरेदी केली, असा ईडीचा दावा आहे. किंगफिशरने मात्र हा दावा खोटा असल्याचे न्यायालयास सांगितले. ईडीने ६० वर्षीय मल्ल्यांना तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर रहाण्यासाठी एप्रिल रोजी शेवटचे समन्स बजावले होते. तत्पूर्वी १८ मार्च एप्रिल रोजी समन्स बजावले होते.










