राहुरी - शहरातील नगर मनमाड रोड लगत साईनगर परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेले दोन बंगले फोडून जवळपास 9 तोळे सोने व 7 ...
राहुरी - शहरातील नगर मनमाड रोड लगत साईनगर परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेले दोन बंगले फोडून जवळपास 9 तोळे सोने व 7 ते 8 हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली.
याबाबत सविस्तर, नगर मनमाड रोड लगत असलेल्या हाॅटेल भाग्यश्री मागील साईनगर परिसरात भाऊसाहेब ज्ञानेश्वर देशमूख व श्रीमती शैलजा नानासाहेब येवले यांची बंगले असून भाऊसाहेब देशमुख हे कामानिमित्त पुणे येथे गेले होते तर श्रीमती शैलजा येवले ह्या तालूक्यातील उंबरे येथे गेल्या होत्या. दोन दिवसांपासून दोघांची बंगले बंद होती. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन दिनांक 12 एप्रिल 2016 च्या मध्यरात्री दरवाजाचे कडी कोंडे तोडून आत प्रवेश केला. यावेळी भाऊसाहेब देशमुख यांच्या घरातील कपाटातून दिड तोळ्याचे नेकलेस, एक तोळ्याची चैन, 3 ग्रॅमच्या कानातील रिंगा, 750 ग्रॅमची छोटी चैन, एकएक ग्रॅमच्या 3 अंगठ्या असे जवळपास साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व दोन तीन हजार रूपये रोख चोरट्यांनी पळविले. तर श्रीमती शैलजा नानासाहेब येवले ह्या काही कामानिमित्त उंबरे येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या घरातील कपाटातून 5 तोळ्याचे गंठण, 3 ग्रॅमच्या कानातील रिंगा, एकएक ग्रॅमच्या दोन नथ असे एकूण साडेपाच तोळ्याचे दागिने व 7 हजार रूपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. परिसरातील नागरीकांना सकाळी उठल्यानंतर घडलेला प्रकार समजला. त्यांनी दोन्ही घर मालकांना फोनवर माहीती दिली. या घरफोडीमध्ये जवळपास 9 तोळे सोन्याचे दागिने व 7 ते 8 हजार रूपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तर याबाबत दुपारी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
एकाच रात्री दोन बंगले फोडून चोरी झाल्याने या परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरीक करीत आहे.










