श्रीगोंदा :- ढवळगाव येथील डॉ. राजेंद्र संभाजी तापकीर यांची पत्नी स्वाती राजेंद्र तपकीर हिची पियोजी फूड प्रॉडक्ट आणि अॅग्रो व मिनरला व...
श्रीगोंदा :- ढवळगाव येथील डॉ. राजेंद्र संभाजी तापकीर यांची पत्नी स्वाती राजेंद्र तपकीर हिची पियोजी फूड प्रॉडक्ट आणि अॅग्रो व मिनरला वॉटर या कंपनीच्या भागीदारीमध्ये १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक करून उलट स्वाती तापकीर आणि त्यांचे पती राजेंद्र तापकीर यांना तुमचा काटा काढतो अशा धमक्या देणा-या येवती ता.. श्रीगोंदा येथील विलास शिवराम दिवटे आणि रुपाली विलास दिवटे यांच्या त्रासाला कंटाळून २८ मार्च २०१६ रोजी ढवळगाव येथील राहत्या घरात स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केली .या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या विलास आणि रुपाली दिवटे यांच्या विरोधात स्वातीचे पती डॉ. राजेंद्र तापकीर यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हा र.नं. आय ३९/२०१६ प्रमाणे दाखल करून घेतला आहे.
डॉ.तापकीर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेकी, रुपाली दिवटे व विलास दिवटे यांनी स्वाती राजेंद्र तपकीर यांच्या बरोबर भागीदारी करून पियोजी फूड प्रॉडक्ट आणि अॅग्रो व मिनरला वॉटर या कंपन्या सुरु केल्या. दि महानगर को- ओप.बँक लि. शिरूर शाखेतून काही कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेऊन ते कर्ज स्वाती तपकीर आणि रुपाली दिवटे या दोघींच्या नावाने उघडलेल्या संयुक्त खात्यात जमा केले.त्या खात्यावरून पैसे काढताना विलास दिवटे यांनी वेळोवेळी ६८ चेकवर स्वाती तापकीर यांच्या खोट्या सह्या करून १ कोटी ३३ लाख रुपये परस्पर हडप केले.या बाबत दि. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी शिरूर पोलीस ठाण्यात रुपाली दिवटे व विलास दिवटे यांच्या विरोधात भा. दं.वि.कलम ४२० अन्वये गुन्हा र.नं. ३८६/२०१५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. परंतु शिरूर पोलिसांनी काहीही दखल घेतली नाही. उलट दिवटे यांना अटकपूर्व जामीन मिळण्याच्या प्रयत्नासाठी फुरसद दिली.
दि. २५ डिसेंबर २०१४ रोजी शिरूर पोलीस ठाण्याला स्वाती तापकीर यांनी अर्ज दिला की, रुपाली आणि विलास दिवटे यांनी आमची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून उलट आमच्याकुटुंबाला संपवण्याच्या धमक्या देत आहेत. शिरूर पोलिसांनी या अर्जाचीही दाखल घेतली नाही. म्हणून १ जानेवारी २०१५ रोजी स्वाती तापकीर हिने पुण्याच्या पोलीस अधिक्षकांकडे दिवटे पती - पत्नी विरुध्द तक्रार अर्ज दिला.त्यांनी शिरूर पोलीस ठाण्याला कारवाई करण्याचे आदेशही दिले परंतु विलास दिवटे यांच्या आहारी गेलेल्या शिरूर पोलीस ठाण्याने वरिष्ठांचे आदेशही धाब्यावर बसविले.
पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळू शकत नाही, आपलीच फसवणूक होऊन आपल्यालाच दिवटे पती पत्नीचा आणि पोलिसांचा त्रास सहन करावा लागत असल्याने आम्ही पती पत्नी हैराण झालो होतो, असे सांगून डॉ. तापकीर म्हणाले,२७ मार्च २०१६ रोजी रुपाली व विलास दिवटे यांनी सकाळी १० वाजता आमच्या हॉस्पिटल मध्ये येऊन दमबाजी केली की, तुमचे पैसे तर मिळणार नाहीतच पण स्वातीने शिरूर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार काढून न घेतल्यास तिचा काटा काढू.त्यानंतर २८ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता दिवटे यांनी चार पांच अनोळखी माणसे हॉस्पिटल मध्ये पाठवून , तुम्ही दिवटे यांच्या नादी लागू नका,त्यांना पैसेही मागू नका, नाहीतर तुमचे आख्खे कुटुंब संपवून टाकू. ही धमकी स्वातीला सहन झाली नाही.तिला कोरड पडली. ती दवाखान्यातून वरच्या मजल्यावर असलेल्या आमच्या निवासस्थानी पाणी पिऊन येते म्हणून गेली. ती परत खाली न आल्याने मी पहिल्या मजल्यावरील आमच्या निवासस्थानी तिला पहावयास गेलो असता तिने स्लॅपच्या हुकला साडी बांधून गळफास घेतलेला होता.शिरूर पोलिसांनी आम्हाला न्याय दिला असता तर स्वातीचे प्राण वाचले असते, असेही डॉ.तापकीर म्हणाले. या फिर्यादीचा तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे रीत आहेत.










