नागपूर - विदर्भाच्यामुद्यावर महाधिवक्ता पदाचा राजीनामा देणारे विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी बुधवारी नागपुरात आपला वाढदिवस साजरा...
नागपूर - विदर्भाच्यामुद्यावर महाधिवक्ता पदाचा राजीनामा देणारे विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी बुधवारी नागपुरात आपला वाढदिवस साजरा करताना महाराष्ट्राच्या आकाराचा केक कापून त्यातून विदर्भ आणि मराठवाडा वेगळे करीत असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, त्यांच्या या कृतीवर प्रतिक्रया देताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अणेंना इशारा दिला आहे. अॅड. अणे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून वेगवेगळ्या जिल्ह्यात जाहीरसभा घेत आहेत. त्यांच्या सभांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या विदर्भवादी भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली होती. महाराष्ट्राचे चार भागही होऊ शकतात, अशी भूमिका वैद्य यांनी मांडली होती. त्यावर महाराष्ट्र म्हणजे वाढदिवसाचा केक नाही, या शब्दात राज ठाकरे यांनी वैद्य यांच्या भूमिकेचा समाचार घेतला होता. तसेच अणेंवरही टीका केली होती. बुधवारी अणे यांचा वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री त्यांनी नागपुरातील रविभवनात कुटुंबाय तसेच सहकाऱ्यांसमवेत केक कापला. त्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रदेश दर्शविण्यात आले होते. महाराष्ट्राच्या आकाराच्या केकमधून त्यांनी विदर्भ मराठवाडा वेगळे करीत राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. वाढदिवसाचा हा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असे अणे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्यांच्या कृतीवर नेमकी काय प्रतिक्रिया उमटते, याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले आहे. विदर्भाद्यांनी या कृतीचे जोरदार समर्थन केले अाहे.










