14 एप्रिल 2016 हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचा समापन दिवस. त्यामुळे राजकीय वर्तुळातही उपलब...
14 एप्रिल 2016 हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचा समापन दिवस. त्यामुळे राजकीय वर्तुळातही उपलब्ध संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न झाला तर नवल वाटायला नको. डॉ. बाबासाहेबांच्या, होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचा मान पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना मिळाला. तेव्हा डॉ. बाबासाहेब हा आपल्या जिव्हाळ्याचा कसा विषय आहे आणि कॉंग्रेसने त्यांना व त्यांच्या अनुयायांना कसे दुर्लक्षित ठेवले. हे सांगण्याचा प्रयत्न केला तर सोमवार दि. 11 रोजी नागपुरात संविधान रॅली काढून डॉ. बाबासाहेब व कॉंग्रेस पक्ष कसे एक आहेत. हे दाखविण्याचा कॉंग्रेसकडून चांगला प्रयत्न झाला. आता या घटनेला जर काही ठोस उत्तर द्यायचे असेल तर त्यासाठी नरेंद्र मोदी यांना 2018 पर्यंत वाट पहावी लागेल का? अशी शंका येते. कारण या राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन त्यांनी केले ते 2018 मध्ये पूर्ण होणार आहे. दरम्यान काही महत्त्वाच्या निवडणुका पार पडलेल्या असतील. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय पुरुषांची विभागणी करणे किंबहुना याला हायजॅक करणे असे म्हणतात तसेच काहिसे घडतांना दिसते. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावही निषिद्ध नाही. गेल्या काही दिवसांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानच बदलण्याची भाषा या ना त्या निमित्ताने ऐकू येते या आक्षेपाला उत्तर देणारे म्हणतात, संविधानातील बदलाला सुरुवात करण्याचे काम कॉंग्रेसने केले. काळानुरुप संविधानातील काही बदल आणि कूण संविधान बदल यापैकी नेमके काय व कसे याबाबत जनता मात्र संभ्रमात आहे. अर्थात विषय कोणताही असो, जनतेला संभ्रमात ठेवण्यातच राजकीय पक्षाचे हीत सामावलेले असते. डॉ. बाबासाहेबांनी वंचित दलित, पिडीत, अन्यायग्रस्त अशांसाठी भरीव तरतुदीचे काम केले आहे. ते त्यांच्या उत्कर्षांसाठी, सत्ताधार्यांनी याच तरतुदीचा लाभ लाभार्थ्यांना क्षमतेने देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करायचे असते. त्याच सोबत आपली अवस्था बदलण्यासाठी संबंधीत घटकांनी देाील तोषिष घ्यायला पाहिजे. किती काळ आम्ही मागासलेले, पिडीत, वंचित राहणार आहोत याचाही विचार व्हायला हवा. मागास, वंचित ही आभुषणे आहेत की दुषणे आहेत याचाही विचार व्हायला हवा. आजकाल राष्ट्रपुरुषांच्या विचारातही विखार पेरण्याचे बेमालूम काम करण्याचा काहींना छंद जडला आहे. मात्र समाजाच्या वाढत्या प्रगल्भतेने असे डाव उधळून लावले जातात, ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब आहे. या मागास अथवा दलित समाजाबल डॉ. बाबासाहेबांना अत्यंतिक कळवळा होता, तो समाज समृद्धीच्या दिशेने पाऊल टाकतोय हेही एक समाधान. मात्र दलित किंवा मागास किंवा वंचित समाजावर अन्याय करणारी घटना अधुनमधून घडते तेव्हा अश्वत्थाम्याच्या जखमेसासारखी या समाजघटकांची जखम भळभळायला लागते. अशावेळी जे कोणी सत्ताधारी असतील व मुख्य जबाबदार सत्ताधिश असतील त्यांनी इकडे तिकडे अंगुलीनिर्देश करुन स्वत:पुरते समाधान शोधण्यापेक्षा समस्येचं निराकरण होण्याकामी काम केले तर ते पाहिजे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात स्वत:चे राजकीय अस्तीत्व जपणार्या राजकारण्यांनीही, ज्या समाजाच्या जीवावर आपण आपले अस्तित्व राखतो त्या समाजासाठीच योगदान देण्याचा विचार करायला हवा. समाजानेही असे योगदान देऊ न शकणार्यांना किती बळ द्यायचे याचा विचार केला पाहिजे. उपलब्ध साधन-सुचिता आणि संधी यांच्यायोगे आपले जीवनमान आणि विचारशक्ती उंचावली पाहिजे. डॉ. बाबासाहेब म्हणाले होते आम्हाला जातीची मते नकोत तर ती विचारांची पाहिजेत. मात्र अंतर्गत शक्ती विघटनासाठी विचारांत विखार पेटवण्याची संभाव्य कूटनिती समाजाला छळणार आहे यात शंका नाही.
सॉलोमन गायकवाड, 9225327301
Email-lssnews24@gmail.com










