पारनेर : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगावातील ममताबाई कचरू उबाळे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक रेवजी जाधव (वय २६) यास जन्मठेप व...
पारनेर : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगावातील ममताबाई कचरू उबाळे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी अशोक रेवजी जाधव (वय २६) यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी सुनावली.
येथील जिल्हा न्यायाधीश दिग्रसकर यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. सरकारच्या वतीने अँड. सुरेश लगड, अनिल डी. सरोदे यांनी बाजू मांडली. फिर्यादी कचरू विष्णु उबाळे (रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर) हे पाटबंधारे विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली होती. राजकारणात भाग घेतो काय, तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी आरोपी जाधव याने दिली होती. चौकीदार उबाळे ७ जुलै रोजी सायंकाळी ते घरी आले. रात्री नऊच्या सुमारास ते झोपण्यासाठी निघून गेले. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना आईचा ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पण, आरोपीने बाहेरून कडी लावली होती. कचरू उबाळे यांनी मुलगा राजेश यास कडी उघडण्यास सांगितले. मात्र, राजेशच्या खोलीचाही दरवाजा आरोपीने बाहेरून लावला होता. राजेश याने शेजार्यास माहिती देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले, त्यामुळे आरोपी पळाला. जाताना त्याने कचरू उबाळे झोपलेले असल्याचे समजून आई ममताबाई यांच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.










