श्रीगोंदा - शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेला मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी व शेतीविकासासाठी वरदान ठरेल असे...
श्रीगोंदा - शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेला मागेल त्याला शेततळे ही योजना शेतकऱ्यांसाठी व शेतीविकासासाठी वरदान ठरेल असे प्रतिपादन आ.राहुल जगताप यांनी कोळगांव (तोंडेवाडी) येथे बोलतांना केले. ते पुढे म्हणाले सध्या सर्वत्र दुष्काळाची पिरस्थिती आहे व त्यातच कोळगांव व परिसर नेहमीच दुष्काळग्रस्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करतांना मोठी कसरत करावी लागते व अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. पाऊस पडणे हे देखील तीतकेच महत्वाचे आहे. याचा विचार करुन शासनाने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे या योजनेची सुरवात केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले. या योजनेअंतर्गत तालुक्यात एकूण 225 शेततळ्यांचे लक्ष असून मागणी वाढल्यास आपण शासन दरबारी पाठपुरावा करुन लक्ष वाढवून घेऊ असेही यावेळी जगताप म्हणाले तर जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी शेतकऱ्यांनी शेततळ्यामध्ये साठवलेल्या पाण्याचा वापर पिकांसाठी ठिबक व तुषार सिंचनाद्वारे करावा व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तोंडेवाडी येथील दादा पदमाकर झरेकर या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्याच्या मंजूर शेततळ्याचे भूमिपूजन आ.राहुल जगताप व जि.प.सदस्य दत्तात्रय पानसरे यांचे हस्ते संभाजी घुटे, कालिदास जगताप, मच्छिंद्र लगड, विश्वास थोरात, नितीन डूबल व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे यांनी केले. तर उमाकांत अनगळ व कृषीसहाय्यक बाळासाहेब लोकरण यांनी उपस्थितांचे आभार मानले.










