पारनेर : पारनेर तालुका दुष्काळी आहे याची आम्हाला जाणीव आहे. तालुक्यातील अनेक भागात फळबागा, पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंच...
पारनेर : पारनेर तालुका दुष्काळी आहे याची आम्हाला जाणीव आहे. तालुक्यातील अनेक भागात फळबागा, पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला देत आहे. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ, असे राज्याचे महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण, सुपा येथे एकनाथ खडसे यांची गुरुवारी पारनेर, जवळे, निघोज, सुपा भागातील शेतकर्यांनी भेट घेऊन त्यांना दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. भाजपाचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, शिवाजी सालके यांनी जवळे, निघोजसह तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या फळबाग, पिके मोठय़ा प्रमाणावर पाण्याअभावी जळाल्याने शेतकरी संकटात आहेत, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, पोपटराव मोरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तुषार मोरे यांच्यासह जवळे, निघोज, वाडेगव्हाण व परिसरातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते. सुपा येथे तहसीलदार भारती सागरे यांनी खडसे यांचे स्वागत केले. यावेळी सुपा येथे ग्रामपंचायत सदस्य भाऊ पवार व मान्यवर हजर होते.










