मुंबई - एसटीबसस्थानकांना महापुरुष तसेच लोकनेत्यांची नावे दिली जाणार नाहीत. महापुरुष आणि लोकनेत्यांचे पुतळे- स्मारके उभारण्यासाठी महामं...
मुंबई - एसटीबसस्थानकांना महापुरुष तसेच लोकनेत्यांची नावे दिली जाणार नाहीत. महापुरुष आणि लोकनेत्यांचे पुतळे- स्मारके उभारण्यासाठी महामंडळाची जागा उपलब्ध करून दिली जाणार नाही, अशी घोषणा परिहवन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्य परिवहन महामंडळाची अशी बसस्थानके आगारे ही त्या ठिकाणच्या नावाने ओळखली जातात. तसेच एकाच शहरात एकापेक्षा अधिक ठिकाणी बसस्थानके आहेत. अशा ठिकाणच्या बसस्थानकांना प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्या स्थानिक क्षेत्रावरून नावे देण्यात आली आहेत. जसे पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानक, स्वारगेट बसस्थानक, नाशिक येथील मेळा बसस्थानक अशी नावे देण्यात आलेली आहेत. अशा बसस्थानकांना कोणत्याही महापुरुष, लोकनेता यांच्या नावाने नामकरण करण्याची राज्य परिवहन महामंडळाचे धोरण अथवा प्रथा नाही, असे रावते यांनी स्पष्ट केले. वाढत्या शहरीकरणामुळे राज्य परिवहन वाहतूक वर्दळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सध्या कार्यरत असलेली राज्य परिवहन बसस्थानके तसेच आगारांच्या जागा प्रवाशांच्या सोयी-सुविधा निर्माण करण्याकरिता अपुऱ्या पडत आहेत. हे लक्षात घेता या जागांमध्ये पुतळे- स्मारके उभारण्यासाठी जागा देणार नाही, असे रावते यांनी सांगितले.










