पारनेर : तालुका दुष्काळी घोषित करून दुष्काळयोजना लागू कराव्या, कांद्याला ३0 रुपये हमी भाव द्यावा, जळालेल्या फळबागांचे पंचनामे करावे...
पारनेर : तालुका दुष्काळी घोषित करून दुष्काळयोजना लागू कराव्या, कांद्याला ३0 रुपये हमी भाव द्यावा, जळालेल्या फळबागांचे पंचनामे करावे, टंचाईचा खोटा सर्वे पुन्हा करावा, आदी मागण्यांसह ८ ते १0 मागण्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जि.प.सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
पारनेर शहरातील लाल चौकातून दुपारी १ वाजता सवाद्य निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर पोलिसांनी तहसील कार्यालत जावू न दिल्याने मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तहसील कार्यालयाला कांद्याचा हार घालून दुग्धाभिषेक करण्यात आला. 'महावितरण'कडून जिरायती व बागायती शेतकर्यांना एकच बिल दिले जात असून यामध्ये शेतकर्यांची फसवणूक होत आहे. कान्हूरपठारच्या कृषी पाणलोटाच्या कामांना लवकरात लवकरसुरूवात करावी, अन्यथा जिल्हा कृषी अधिकार्यांना पुष्पहार घालू, असा इशारा ठुबे यांनी दिला. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संतोष खोडदे, विलास लोंढे, अच्युतराव जगदाळे, शंकर नगरे, शाहीर गायकवाड, सुधाकर नगरे,गणेश कावरे, संतोष ठुबे, विजय काकडे, रवी गायकवाड आदींनी प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतले. कांदा भावावर शेतकरी आक्रमक झाले होते. तहसील कार्यालयासमोर तब्बल ५ तास चाललेल्या सभेत कोणत्याही अधिकार्यांनी हजेरी लावली नाही. यामुळे ठुबेंसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. तहसीलदार भारती सागरे व इतर अधिकार्यांनी उशिरा येऊन उत्तरे दिली.










