नगर - शहरातील कथित इस्टेट एजंट अन्वर मुश्ताक पटेल (२९, नालसाब सवारीजवळ, झेंडीगेट) याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा ...

नगर - शहरातील कथित इस्टेट एजंट अन्वर मुश्ताक पटेल (२९, नालसाब सवारीजवळ, झेंडीगेट) याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. शनिवारी रात्री अन्वरचा मृतदेह कामरगाव शिवारात आढळला. नगर तालुका पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, परंतु याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करत नातेवाईक मित्रमंडळींनी अन्वरचा मृतदेह रविवारी रात्री साडेदहापर्यंत नगर तालुका पोलिस ठाण्यासमोरच ठेवला. रात्री उशिरा जुन्या पिढीतील ख्यातनाम संगीतकार माणिक हाथीदारू यांच्यासह पाचजणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. शिलाविहार भागातील एक मालमत्ता विकत घेतली होती. त्यावरून त्याचे काहीजणांशी वाद झाले होते. त्यातूनच खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. खुनाचा गुन्हा नोंदवेपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यासमोरून हलवणार नाही, असा पावित्रा पोलिस ठाण्यात जमलेल्या जमावाने घेतला. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परीविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक विशाल आनंद, नगर ग्रामीण उपविभागाचे उपअधीक्षक आनंद भोईटे, सहायक निरीक्षक विनोद पाटील यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अन्वरचा भाऊ एजाज याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून घेतला. जागेचा वाद कारणीभूत मृतअन्वर पटेल हा इस्टेट एजंट म्हणून काम करत असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अन्वरचे एका जागेचे साठेखत झाले होते, पण या जागेवरील हक्क तो सोडत नव्हता. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून त्याला मारहाण करून खून केल्याचे अन्वरचा भाऊ एजाज याने फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओचाही वापर केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून योग्य दिशेने तपास करण्याचे आश्वासन अन्वरच्या नातेवाईकांना दिले आहे.









