अहमदनगर: जूनमध्ये होणा-या महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला कोणी गृहीत धरू नये. महापौर पदाची खांदेपालट करताना रा...
अहमदनगर: जूनमध्ये होणा-या महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला कोणी गृहीत धरू नये. महापौर पदाची खांदेपालट करताना राष्ट्रवादीने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. नगरसेवकांची मागणी लक्षात घेता स्वतंत्र भूमिका घ्यायची की कसे, याचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाणार असल्याची माहिती प्रदेश युवक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. आगामी महापौर पदाची निवडणूक नगर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कॉँग्रेसला कोणी गृहीत धरू नये, कॉँग्रेस पक्ष आपला निर्णय घ्यायला स्वतंत्र व सक्षम आहे. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने या अगोदरच्या महापौर पदाच्या निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. अभिषेक कळमकर यांना महापौर करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर स्थानिक पातळीवर दोन्ही कॉँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यात कॉँग्रेसला महिला व बालकल्याण समितीचे सभापती अथवा आरोग्य समिती देण्याचा निर्णय झाला होता. याशिवाय सर्व नगरसेवकांना समान निधी वाटप, महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमाला दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले जाईल तसेच दोन्ही पक्षात समन्वय ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला. राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी तसे लेखी पत्रही दिले.










