सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जूनला मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार आहे अहमदनगर : शासन अनुदानीत शाळा आणि स्थानिक ...
सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जूनला मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार आहे
अहमदनगर : शासन अनुदानीत शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी १५ जूनला मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सात तालुक्यातील पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर पोहच केली आहेत.
केंद्र पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी शासन अनुदानीत शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात. यात मराठी, इंग्रजी, समाज अभ्यास, विज्ञान, हिंदी-संस्कृत या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने केलेल्या नियोजनामुळे पुणे येथून बालभारतीच्या कार्यालयातून सात तालुक्यातील पाठ्यपुस्तके त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी पोहच झाले आहेत. १ जून ला पाठ्यपुस्तके केंद्र आणि शाळा स्तरावर पोहच होणार आहेत. शासन अनुदानीत शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी या योजनेत वंचित राहणार नाही, असे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील पहिली ते पाचवीपर्यंतचे २ लाख ९८ हजार ६२९ विद्यार्थी असून सहावी ते आठवीचे २ लाख ७२ हजार ९७४ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत. पुस्तकांचा पुरवठा बाकी असणाऱ्या सात तालुक्यातील पुस्तके चालू आठवड्यात पोहोच होतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे










