लातूरच्या युवतीचा नगरमध्ये खून अहमदनगर : नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील जुना जकात नाका परिसरात इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन तरुणीच...
लातूरच्या युवतीचा नगरमध्ये खून
अहमदनगर : नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील जुना जकात नाका परिसरात इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन तरुणीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. शुक्रवारी अकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी स्वत:हून पोलिसांत हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.प्रदीप माणिक कनसे (व्यवसाय-चालक, रा. ताळणी, ता.रेणापूर, जि.लातूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मोहिनी तान्हाजी सूर्यवंशी (रा. हाडगा, ता. निलंगा, जि.लातूर) असे मृत अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. तीर्थप्रसाद ज्ञानोबा आनंतवाड यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. लातूर जिल्ह्यातील बोरी गावचे आनंतवाड हे नोकरीनिमित्त नगर येथील बुरूडगाव रस्त्यावरील आठरे निवास इमारतीत राहत होते. आनंतवाड हे मृत मोहिनीचे काका आहे.
मोहिनी ही मावशीकडे आली होती. शुक्रवारी सकाळी आरोपी प्रदीप हा त्यांच्या घरी गेला. घराच्या छतावर प्रदीप याने मोहिनीच्या डोके, गालावर व दोन्ही हातावर कोयत्याने सपासप वार केले. त्यात ती जागीच ठार झाली.
घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, पाटील, करेवाड यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा बुरूडगाव रस्त्यावरील आठरे इमारतीत पोहचला.
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मृत मोहिनीच्या आई-वडिलांना कळविले असून ते नगरला आल्यानंतरच खुनाचे कारण समजू शकेल अशी माहिती पोलीस निरीक्षक मालकर यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार तीर्थप्रसाद आनंतवाड हे एमआयडीसीत नोकरीला असून त्यांची पत्नी राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून सेवेत आहे. घटना घडली त्यावेळी आनंतवाड पती-पत्नी दोघेही घरात नव्हते. ते नोकरीसाठी गेले होते. आरोपीची माहिती व आनंतवाड यांच्या माहितीत विसंगती असल्याने नेमक्या कोणत्या कारणातून मोहिनी सूर्यवंशीचा खून झाला या कारणापर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत










