जिल्हा परिषद सदस्यांना लागले निवडणुकीचे वेध अहमदनगर : अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निव...
जिल्हा परिषद सदस्यांना लागले निवडणुकीचे वेध
अहमदनगर : अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना वेध लागले आहेत. सध्या हे सदस्य आणि पदाधिकारी आपआपल्या गटात, मतदारसंघात अधिकाधिक निधी देण्यात आणि त्यांच्या विकास कामांच्या उद्घाटनात दंग असल्याचे चित्र आहे. तर पक्षीय पातळीवर पंचायत राज निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राजकीय शह काटशहाचा जिल्हा म्हणून राज्यात नगरकडे पाहले जाते. या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील राजकीय स्थिती वेगळी असून प्रत्येकाचे थेट मुंबईत वजन आहे. यामुळे निवडणूक कोणतीही असो, ती रंगतदार झाल्याशिवाय राहत नाही. पंचायत व्यवस्था हा तर राजकारणाचा पाया असल्याचे या ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगर जिल्हा परिषदेत सध्या ७५ गट आणि १५० गण अस्तित्वात आहे. या गट आणि गणाच्या रचनेचे काम अंतिम टप्प्यात असून यात गट आणि गणाची संख्या कमी होणार नसली तरी काही गावे एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्हा परिषदेत पाच पदाधिकारी यांच्यासह सदस्य आपल्या गटात अधिकाधिक कामे नेण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष करून रस्ते, बंधारे, शाळा खोल्यांना अधिक मागणी आहे. यासह तीर्थक्षेत्र विकासाची कामे करण्यावर सदस्यांचा भर आहे.
यासह मिळालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका जिल्हाभर सुरू आहे. जिल्हा परिषदेत सध्या सर्वाधिक कागदावर ३० सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. त्या खालोखाल काँग्रेस २८, सेना ६ आणि भाजपा ७, अपक्ष ३ आणि कम्युनिस्ट १ असे पक्षीय बलाबल आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजपात गेले असून यामुळे भाजपाची ताकद वाढलेली आहे.
पक्षीय आणि संघटनात्मक पातळीवर पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या बैठका आणि चाचपणी सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत पंचायत राज व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. युती आणि आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात आले.










