प्रभागात नळावाटे दुषित पाणीपुरवठा प्रभाग २ मधील संत भगवानबाबा चौक, सत्कार कॉलनी, पोलिस कॉलनी या भागातील सांडपाणी वाहून जाणार्या गटार...
प्रभागात नळावाटे दुषित पाणीपुरवठा
प्रभाग २ मधील संत भगवानबाबा चौक, सत्कार कॉलनी, पोलिस कॉलनी या भागातील सांडपाणी वाहून जाणार्या गटारीची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली असल्याने या गटारीतील पाणी नळावाटे नागरिकांच्या घरात जात आहे. त्यामुळे या गटारीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी तसेच निर्मलनगर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणी या भागातील महिला व नागरिकांनी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे केली आहे. महिलांनी महापौरांना घेराव घालून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, या भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी खुली गटार आहे. तिची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या गटारीच्या शेजारुन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेलेली असल्याने गटारीतील घाणपाणी नळाद्वारे येते. पिण्याच्या पाण्यात गटारीच्या पाण्याचा वास येतो. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच उघड्या गटारीमुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून साथीचे रोग पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या भागातील गटारीची दुरुस्ती करुन नवीन बंद पाईप गटार करावी तसेच नियमीतपणे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. यावेळी प्रभागातील नगरसेविका रुपाली वारे, निखिल वारे यांच्या नेतृत्वाखाली उषा सानप, शिल्पा जायभाय, लता पालवे, सुमन सानप, अरुणा पानसरे, शोभा सानप, मिरा पालवे, विजय सानप, अलका आव्हाड, किरण आव्हाड, पप्पू जाधव, निलेश आव्हाड, उमेश थोरात यांच्यासह नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.










