तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता दिल्ली, दि. 16 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के...
तीन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता
दिल्ली, दि. 16 : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आता मंत्रिमंडळात 22 जून रोजी मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर असमाधानकारक कामगिरी करणार्या किमान तीन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असून काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला जाणार असल्याचे वृत्त आहे. या फेरबदलामध्ये उत्तर प्रदेश व उत्तराखंडला अधिक प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे.
सातत्याने वादग्रस्त विधाने करून पक्षाला व सरकारला अडचणीत आणणारे लघुउद्योग राज्यमंत्री गिरिराजसिंग, असमाधानकारक कामगिरी असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला आणि बलात्काराचा आरोप असलेले रसायनमंत्री निहालचंद यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिपदासाठी राजस्थानचे राज्यसभा सदस्य ओम माथूर, अर्जुन मेघवाल व अन्य तीन जणांची नावे चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि संजीव बालियान यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली जाण्याची शक्यता आहे. ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार असलेले आणि उत्तम कामगिरी करणारे पियुष गोयल यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी दिली जाऊ शकते. सर्बानंद सोनोवाल यांनी आसामचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यामुळे क्रीडा राज्यमंत्रिपद रिक्त आहे. त्यामुळे स्वतंत्र कार्यभार असलेल्या या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता आहे. अलाहाबादचे खासदार शामचरण गुप्ता, बिकानेरचे खासदार अर्जुन मेघवाल यांचीही नाव चर्चेत आहेत. आसाममध्ये जनतेने भाजपला भरघोस यश दिल्याने तेथील नेते रामेश्वर तेली आणि उत्तराखंडचे भगतसिंग कोशियारी यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
राज्यसभेवर निवडून गेलेले विनय सहस्त्रबुद्धे यांचेही नाव चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टीने असमाधानकारक कामगिरी असलेल्या मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची आणि काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्येष्ठ मंत्री अरुण जेटली, राजनाथसिंग, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्या खात्यांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांना मंत्रिमंडळात लवकरात लवकर बदल करायचे असल्याने 18 ते 23 जून या कालावधीत केव्हाही मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. मात्र, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे 18 जूननंतर मायदेशात परतणार असून पंतप्रधान मोदी हे 23 जून रोजी परदेश दौर्यावर जाणार आहेत. त्यातच 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 22 जून रोजी मंत्रिमंडळात फेरबदल होईल, असेही सूत्रांनी सांगितले.









