जामखेड जेलमधील फरारी भरत भोसले गजाआड अहमदनगर :सुमारे दीड वर्षापूर्वी जामखेड पोलिस ठाण्यातील लॉक-अप तोडून पळालेला आरोपी भरत विलास भोसले...
जामखेड जेलमधील फरारी भरत भोसले गजाआड
अहमदनगर :सुमारे दीड वर्षापूर्वी जामखेड पोलिस ठाण्यातील लॉक-अप तोडून पळालेला आरोपी भरत विलास भोसले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली.
भरत भोसले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खुनासह, दरोडा,जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सुमारे दीड वर्षापूर्वी भरत भोसले हा जामखेड पोलिस ठाण्यातील लॉक-अप तोडून फरार झाला होता. तेव्हापासून तो पोलिसांची नगर चुकवून बीड, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणे बदलून वास्तव्य करीत होता. आरोपी भोसले हा श्रीगोंदा तालुक्यातील तरडगव्हाण शिवारात येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजली. त्या आधारे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ.सौरभ त्रिपाठी, अप्पर पोलिस अधीक्षक राजा आर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.शशिराज पाटोळे, पोसई राजकुमार हिंगोले, पोहेकॉ.मधुकर शिंदे, दादासाहेब काकडे, पोकॉ.दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, सागर सुलाने,चापोना. बबन बेरड, पोकॉ.नामदेव जाधव यांच्या पथकाने तरडगव्हाण शिवारात नियोजनबद्ध सापळा रचून आरोपी भरत भोसले याला जेरबंद केले.










