महापौर व उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त २१ जूनचा? अहमदनगर :शहराचे सत्ताकेंद्र असलेल्या महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा म...
अहमदनगर :शहराचे सत्ताकेंद्र असलेल्या महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त २१ जून असल्याचे समजते. जिल्हा प्रशासन यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीची तारीख २१ जून असल्याचे रात्री उशिरापर्यंत समाज माध्यमांवरून संदेश दिले जात होते. पण, प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिला गेला नाही.
विद्यमान महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ संपत आहे. महापालिका प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त जिल्हा प्रशासनाला संपर्क करून निवडणुकीची तारीख निश्चित करते. पण यासंदर्भातील कोणताच आदेश नसल्याचे सांगण्यात आले. महापालिकिचे सत्ता सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीच्या ताब्यात आहे. यावेळी दोन्ही पदासाठी महिला आरक्षण आहे. ती सत्ता राखण्यासाठी आघाडीचा प्रय▪आहे. दोन्ही कॉंग्रेस अंतर्गत असलेली धुसफूस शमविण्याचे काम वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे. आघाडीच्या उमेदवार विखे पाटील गटाचा असणार असल्याचे संकेत आहेत.
भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीने देखील सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. भाजप व शिवसेनेमध्ये देखील विळ्य़ा-भोपळ्य़ाचे चित्र आहे. सत्ता मिळविण्यासाठी दोन्हीकडचे नेते सध्या एक पाऊल मागे, अशा भूमिकेत आहेत. यातच भाजपातील वरिष्ठांकडून महापौर पक्षाचाच होईल, अशी भूमिका जाहीर केली जात आहे. त्यामुळे शिवसेना अस्वस्थ आहे. शिवसेनेने यावेळी सावध पावित्रा घेत बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. पक्षीय बलाबल कसे असले, तरी तडजोडीचे राजकारण महापौर व उपमहापौर निश्चित करतील, असे सांगितले जात आहे










