सुपा एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन सुपा :पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या वि...
सुपा एमआयडीसीतील कंत्राटी
कामगारांबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन
सुपा :पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत नारायणगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे,वाघुंडे येथील दिलीप दिवटे तसेच सुपा व वाघुंडे परिसरातील ग्रामस्थांनी ज़िल्हाधिकारी अनिल कवडे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की,सुपा एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांवर होणारा अन्याय थांबविण्यात यावा,औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित शेतकर्यांच्या भूमिपुत्रांना कंपनीमध्ये कामावर घ्यावे, वसाहतीमध्ये शेतकरी व कामगारांची फसवणूक व शोषण करणार्या अधिकार्यांवर त्वरित कारवाई करावी, एमआयडीसीमधील कंपन्यांतील कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात असून, कामाच्या प्रमाणात मोबदला दिला जात नसल्याचे तसेच त्यांच्या मानसिकतेचा व आरोग्याचा विचार केला जात नाही.प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था नसल्याने लुटमरीच्या घटना घडतात,कामाचे दिवस भरूनही कायम केले जात नाही. सुपा औद्योगिक वसाहतीसाठी संपादित बागायत जमिनीला जिरायत जमिनीचा मोबदला देऊन शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली असून, भूमिपुत्रांना कायमस्वरुपी कामावर घेण्याचे खोटी आश्वासने देऊन शेतकर्यांच्या मुलांना वार्यावर सोडले आहे. प्रदूषणामुळे अनेक शेतकर्यांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. कारखाने न उभारता ज्या जमिनी पडीक आहेत, त्या मूळ शेतकर्यांना परत कराव्यात ,शेतकर्यांची व कामगारांची पिळवणूक करणार्या आधिकार्यांवर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. याची दखल न घेतल्यास दि २ जुलैपासून धरणो आंदोलन व त्यानंतर दि.४ जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति कामगार आयुक्त,एमआयडीसी अधिकारी,पोलिस अधीक्षक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत









