श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदी सुनीता शिंदे श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची लढाई भाजपाच्या सुनीता शिंदे यांनी दोन मतांनी जिं...
श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदी सुनीता शिंदे
श्रीगोंदा : श्रीगोंदाच्या नगराध्यक्षपदाची लढाई भाजपाच्या सुनीता शिंदे यांनी दोन मतांनी जिंकली. नागवडे गटाच्या तीन तर आमदार राहुल जगताप गटाच्या एक नगरसेविका गैरहजर राहिल्या. राजेंद्र नागवडे यांनी शब्द पाळल्याने पाचपुते गटाचे पालिकेवर वर्चस्व कायम राहिले. निवडीनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर आ. जगताप यांच्या गोटात सन्नाटा होता.
निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस १८ पैकी १४ नगरसेवक हजर होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या सुनीता शिंदे यांना ८ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना शेंडगे यांना ६ मिळाली. त्यामुळे सुनीता शिंदे विजयी झाल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आले.
नागवडे गटाच्या गयाबाई सुपेकर, वैशाली आळेकर, कुसुम दांडेकर, आ. जगताप गटाच्या अर्चना गोरे या नगरसेविका व्हीपच्या फतव्यामुळे गैरहजर राहिल्या. निवडणुकीनंतर संत शेख महंमद महाराज मंदिरात विजयी सभा झाली. सभेत माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, बाळासाहेब महाडिक, मनोहर पोटे, पोपटराव खेतमाळीस यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.
सुनीता शिंदे यांना मागील महिन्यात भाजपा महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष पद मिळाले आणि महिनाभरातच त्यांना नगराध्यक्षापदाची लॉटरी लागली आहे










