'पीएफ'ची मागणी केल्याने ४५ कामगार घरी अहमदनगर : भविष्य निर्वाह निधी भरण्याची मागणी केल्याच्या कारणावरून कामावरून कमी केलेल...
'पीएफ'ची मागणी केल्याने ४५ कामगार घरी
अहमदनगर : भविष्य निर्वाह निधी भरण्याची मागणी केल्याच्या कारणावरून कामावरून कमी केलेल्या ४५ कामगारांना परत घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय कामगार सेनेच्या वतीने नागापूर औद्योगिक वसाहतीतील क्लासिक व्हिल-२ कंपनीसमोर गुरुवारी उपोषण केले.
कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उनवणे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांत सचिन पवार, सागर शिर्के, योगेस कडूस, प्रशांत बोर्डे, संदीप इंगळे, एकनाथ झरेकर यांचा समावेश होता. यावेळी दिलेल्या निवेदनात नमुद आहे, गेल्या चार वर्षांपासून ४५ कामगार क्लासिक व्हिल-२ मध्ये काम करत होते. कंपनीत कामगारांच्या मागण्यांसाठी संघटना स्थापन केली. सेवेत कायम करण्याचे पत्र व भविष्य निर्वाह निधी भरण्याची मागणी कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाकडे केली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले. त्यामुळे सर्व कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, कंपनीने कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.










